आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेत विषयी संपूर्ण माहिती सदरच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. १२ डिसेंबर २०२० रोजी शरद पवार यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ही योजना सुरू करण्यात आली,त्याचबरोबर त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी या योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून गावांच्या आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर सदरच्या योजनेअंतर्गत रोजगारही उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सदरच्या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेळी पालन, कुक्कुटपालन, गाय म्हैस पालन करण्यासाठी शेड बांधकामासाठी अनुदान दिले जाणार आहे. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यांमध्ये ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Sharad Pawar Gram Samriddhi Yojana 2024
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती पाहताना आपण यामध्ये या योजनेची उद्दिष्टे, या योजनेसाठीची पात्रता, त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, तसेच या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते, आणि सर्वात शेवटी म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण सदरच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेबाबत थोडक्यात…
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) काही योजनांच्या एकत्रीकरणातून सदरची योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी अनुदान दिले जाणार आहे ते खालील प्रमाणे.
- गाय म्हैस पालन करण्यासाठी पक्का गोठा बांधणी.
- शेळीपालनासाठी शेड बांधणी.
- कुक्कुटपालनासाठी शेड बांधणी.
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग
वरील चार कामांसाठी या योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाणार आहे. या कामांसाठी किती अनुदान दिले जाणार आहे हे आपण नंतर खाली पाहणारच आहोत.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची उद्दिष्टे
- शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल.
- या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कामांमध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध होतील. यामुळे गावातील लोकांना आणि तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल आणि गावातून शहराकडे होणारे स्थलांतर रोखता येईल.
- सदरच्या योजनेबरोबरच आणखी अनेक योजना राबविण्यात येणार आहेत.
- गावातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी गावातील सर्व महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये विहीर दुष्काळी भागाला पाणीपुरवठा गावातील रस्ते बांधणे आदी बाबींवर विशेष असे लक्ष दिले जाणार आहेत. त्याचबरोबर शेतापर्यंत जाणारे १ लाख किलोमीटरचे रस्ते सरकार बांधणार आहे.
सदरची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून सरकार मार्फत शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवली जाणार आहे. या योजनेमध्ये मुख्यत्वे करून गाव आणि शेतकरी यांच्यावर विशेष असे लक्ष दिले आहेत.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे
- रहिवाशी दाखला
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- उत्पन्न दाखला
वरील सर्व कागदपत्रे शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी आवश्यक आहेत.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठीची पात्रता
- शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा व्यक्ती हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी फक्त ग्रामीण भागात राहणारे व्यक्तीच अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे सर्व प्रमाणित कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
वरील पात्रतेमध्ये बसणारी व्यक्ती ही शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी पात्र असेल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारे लाभ हे खालील प्रमाणे आहेत.
- शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला मिळणार आहे.
- ग्रामीण भागातील व्यक्तींना गाई, म्हैस, शेळ्या, मेंढ्यांसाठी शेड बांधण्यात येणार आहेत.
- एखाद्या व्यक्तीकडे दोन जनावरे असली तरीही त्या व्यक्तीला शेडचा लाभ मिळू शकतो.
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अंतर्गत, जर एखाद्या व्यक्तीला पोल्ट्री फार्म उघडायचा असेल तर सरकार अर्जदारांना आर्थिक मदत करणार आहे.
- या योजनेअंतर्गत शेतापर्यंत जाणारे १ लाख किमीचे रस्ते बांधण्यात येणार आहे.
- ग्रामीण भागात राहणाऱ्या कामगारांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांचे रोजगाराच्या माध्यमातून उत्पन्न वाढवता येईल.
- ग्रामीण भागात ज्या ठिकाणी रस्ते व पाणीपुरवठ्याच्या सोयीने त्या ठिकाणी सरकार या पायाभूत सुविधा पुरवणार आहे.
- सदरची योजना ही मनरेगांशी जोडली असल्यामुळे या योजनेमध्ये मनरेगा योजनेतील कामांचा समावेश होणार आहेत.
- उन्हाळ्यात शेतकऱ्याकडे पाणीपुरवठासाठीची साधने नसतात अशा परिस्थितीत शासन सिंचनाची साधने उपलब्ध करून देणार आहे.
वरील सर्व लाभ शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत कोणत्या कामासाठी किती अनुदान दिले जाणार आहे ते सविस्तरपणे खाली पाहूया.
गाय व म्हैस पालनासाठी पक्का गोठा बांधकाम
यामध्ये २ ते ६ जनावरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी ७७,१८८ रुपये इतकी अनुदान दिले जाणार आहे.
६ पेक्षा अधिक जनावरांसाठी ६ सहाच्या पटीत म्हणजे १२ जनावरांसाठी दुप्पट, तर १८ पेक्षा जास्त जनावरांसाठी तिप्पट अनुदान मिळणार आहे.
कुक्कुटपालन शेड बांधकाम
१०० कोंबड्यांकरिता शेड बांधायचे असेल तर ४९,७६० रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे.१५० पेक्षा जास्त कोंबड्यांसाठी दुप्पट निधी शेड बांधण्यासाठी दिला जाणार आहे.
एखाद्या व्यक्तीकडे १०० कोंबड्या नसल्यास १०० रुपयाच्या स्टॅम्पवर २ जामीनदारासह अर्ज करून शेडची मागणी करायची आहे. त्यानंतर शेड मंजूर झाल्यानंतर आणि शेडचे बांधकाम पूर्ण केल्यावर त्यामध्ये १०० कोंबड्या असणे बंधनकारक आहे.
शेळीपालन शेड बांधकाम
१० शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी ४९,२८४ रुपये अनुदान दिले जाणार शेळ्यांसाठी दुप्पट अनुदान, तर ३० शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाणार आहे. अर्जदाराकडे १० शेळ्या नसतील तर किमान २ शेळ्या असणे आवश्यक आहे असे शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे.
भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग
शेतामधील कचरा एकत्रित करून नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी १०,५३७ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
वरील सर्व बांधकामासाठी लांबी, रुंदी आणि जमिनीचे क्षेत्रफळ किती असावे याची संपूर्ण माहिती शासन निर्णयामध्ये सविस्तर स्वरूपात दिली आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अर्ज प्रक्रिया
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण खाली पाहणार आहोत.
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे.
- सुरुवातीला सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्राम विकास अधिकारी यापैकी कोणाकडे अर्ज करत आहात त्यांच्या नावावर बरोबर चिन्हाची खूण करायची आहे.
- नंतर त्याखाली ग्रामपंचायतचे नाव, तालुका, जिल्हा ही माहिती भरायची आहे. त्याचबरोबर अर्जाच्या उजव्या बाजूला तारीख टाकून फोटो चिटकवायचा आहे.
- त्यानंतर अर्जावर अर्जदाराचे नाव, पत्ता, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर भरायचा आहे.
- ज्या कामासाठी अर्ज करायचा आहे त्या कामासमोर बरोबर चिन्हाची खूण करायची आहे.(अर्जावर मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांची यादी आहे, पण आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी अर्ज करायचा असल्याने ज्या कामासाठी आपणाला अर्ज करायचा आहे किंवा ज्या कामासाठी अनुदान हवे आहे त्या कामासमोर बरोबर चिन्हाची खूण करायचे आहे)
- या योजनेअंतर्गत प्रत्येक कामांसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे.
- त्यानंतर कुटुंबाचा प्रकार निवडायचा आहे. मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, महिला प्रधान कुटुंब, शारीरिक अपंगत्व प्रधान असलेले कुटुंब, भू-सुधार आणि इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी,२००८ च्या कृषी कर्जमाफी योजनेनुसार अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी वरीलपैकी ज्या प्रकारात तुमच्या कुटुंबाचा समावेश होत असेल त्यासमोर बरोबर चिन्हाची खूण करायची आहे.
- कामाचा जो प्रकार निवडला आहे त्यासंबंधीची कागदपत्रे त्यासोबत जोडायची आहेत.
- जो कोणी या योजनेचा लाभ घेणार आहे त्याच्या नावे जमीन आहे का? जमीन असल्यास हो म्हणून सातबारा, ८-अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे.
- अर्जदार हा ज्या गावचा रहिवाशी आहे त्या गावचा रहिवासी दाखला जोडायचा. नंतर तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवासी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये येत आहे का? ते सांगायचे आहे.
- अर्जामध्ये अर्जदाराच्या कुटुंबातील १८ वर्षावरील पुरुष, स्त्री आणि एकूण सदस्यांची संख्या लिहायची आहे.
- शेवटी घोषणा पत्रावर नाव लिहून सही किंवा अंगठा करायचा आहे.
- या सोबतच मनरेगाचे जॉब कार्ड, ८-अ, सातबारा उतारा आणि ग्रामपंचायत मालमत्ता नमुना ८-अ चा उतारा जोडायचा आहे.
- त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. यासोबतच सरपंचांनी ग्रामसेवकांच्या सहीचे एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे. यामध्ये लाभार्थी सदर कामाचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
- शेवटी सदरच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकाऱ्याच्या सही शिक्यानुसार पोचपावती दिली जाईल यामध्ये तुम्ही लाभासाठी पात्र आहे की नाही ही सांगितले जाईल किंवा नमूद केले जाईल.
- तुम्ही जर मनरेगाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. पण तुमच्याकडे मनरेगाचे जॉब कार्ड नसेल तर मात्र तुम्हाला सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालयातून जॉब कार्ड मिळण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
वरील अर्ज प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने केली जाणारी आहे. त्यामुळे जर कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करणार असेल तर ती व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज न करता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकते.
सदरच्या लेखामध्ये आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजने विषयीची संपूर्ण माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहिले आहे. माहितीच्या आधारे जर कोणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल तर अर्ज करू शकता.